- नागरिकांकडून यात्रेची जय्यत तयारी
बेळगाव / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बेळगाव वडगाव येथील ग्रामदेवता श्रीमंगाई देवीची यात्रा आज मंगळवार दिनांक ११ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी केले जाणार आहे.
यात्रेची वडगाव परिसरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. यात्रा असल्यामुळे घरांना रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकाश पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने, गृहउपयोगी साहित्य यांनी वडगावचे रस्ते फुलून गेले आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात व उत्साहात यात्रा भरते. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे. शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मागील महिनाभरापासून वडगाव मध्ये देवीचे वार पाळण्यात आले. याचबरोबर इतर धार्मिक विधी करण्यात येत असतात. आज मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून गाऱ्हाणे उतरविण्यात येणार आहे. त्यानंतर यात्रेला सुरुवात होत आहे. यात्रेला होणारी मोठी गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी,प्रशासनाकडून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
0 Comments