विजयपूर / वार्ताहर

चालकाचा ताबा सुटल्याने क्रुझर पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर चार जण जखमी झाले. विजयपूर जिल्ह्याच्या देवरहिप्परगी गावानजीक भेरवाडी क्रॉस जवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. हुसेनबादशाह  मुजावर (वय ३८), अस्लम नदाफ (वय १९), महम्मद मुजावर (तिघेही रा. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार क्रुझर मधून सर्वजण विजयपूर होऊन बिजलभावी गावात एका कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी भेरवाडी क्रॉस नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.अपघाताची माहिती मिळताच देवरहिप्परगी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद देवरहिप्परगी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.