बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा  पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार व बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षपदी वीणा विजापूरे, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी वाणी विलास जोशी, लेखा  स्थायी समिती अध्यक्षपदी सविता मुरुगेंद्रगौडा पाटील यांची तर आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर महापौर-उपमहापौर यांच्यासह  आजी-माजी आमदारांनी नूतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले, स्थायी अध्यक्षांची निवड होईपर्यंत नगरसेवकांना पूर्णतः अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने नगरसेवकांना पूर्ण अधिकार मिळाले आहेत. येत्या काळात चारही स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि महापौर-उपमहापौर एकत्रितपणे संपूर्ण राज्यात  बेळगाव शहराळ एक आदर्श शहर बनविण्यासाठी कार्य करतील. तसेच शहराच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतील असे त्यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले , स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा कायम राखण्यात आली आहे. बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी, शहराच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व अध्यक्ष व सदस्यांना सर्व  नगरसेवक सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून बेनके यांनी नूतन  अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके आदींच्या मार्गदर्शनाखाली आज आमची बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व स्थायी सदस्यांचे मनापासून आभार. सर्वांच्या सहकार्याने आम्ही स्थायी समित्यांचा कारभार सक्षमपणे चालवू अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या नूतन अध्यक्षा वाणी विलास जोशी यांनी दिली. 

लेखा  स्थायी समिती अध्यक्षा सविता पाटील आणि कर व महसूल स्थायीच्या अध्यक्षा वीणा विजापूर यांनी आमदार अभय पाटील , महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने आम्ही जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याचा विश्वास व्यक्त केला. 

एकंदरीत उशिराने का होईना बेळगाव मनपाच्या सर्व चारही स्थायी समिती अध्यक्षांची परंपरेप्रमाणे बिनविरोध निवड पार पडल्याने महापालिकेचा कारभार सुरळीत होईल हीच सर्वांची अपेक्षा आहे.