बेळगाव / प्रतिनिधी
गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत असून या अंतर्गत आज मुद्रा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे. खाजगी ऑनलाईन केंद्रावरून ग्रामवन केंद्रांची आयडी वापरून गृहलक्ष्मी लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांकडून २५० रुपये येणाऱ्या केंद्राला अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिला सदस्यला प्रति महिना २००० रुपये देण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन केंद्रांच्या माध्यमातून अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १९ जुलै रोजी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी महिलांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही ऑनलाईन केंद्रांवर नोंदणीसाठी पैसे आकारत असल्याची माहिती पुढे आली.
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पैसे आकारणाऱ्या ऑनलाईन केंद्रांना इशारा दिला होता. मात्र अद्यापही काही ठिकाणी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काल शहरातील चव्हाण गल्ली येथील ऑनलाईन केंद्रावर कारवाई करण्यात आली होती आणि आज मुतगा येथील ऑनलाईन केंद्रावर टाळे ठोकून कारवाई करण्यात आली आहे. महिला बालकल्याण खात्याचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी सदर कारवाई केली आहे.
0 Comments