विजयपूर / वार्ताहर 

सतत पडत असलेल्या पावसामुळे एका जुन्या घराचे छत कोसळून वृद्ध महिला जागीच ठार झाली. विजयपूर तालुक्याच्या कन्नूर गावात  सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. शिवम्मा सावलगी (वय ६०) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कन्नूर गावात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान गावातील  जुनाट घराचे छत कोसळून शिवम्मा सावलगी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घरात ती एकटीच राहत होती अशी माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी  घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी  विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.