• अध्यक्षपदी लक्ष्मी यळगूकर तर उपाध्यक्षपदी शंकर सुतार

हिंडलगा : गेल्या अडीच वर्षांपूर्वी समिती नेते आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी ग्रामपंचायतीवर चेतन पाटील यांना अध्यक्ष करून महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवला होता.

यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत समितीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे सगळ्या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता येणार असे मनसुबे बाळगणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून समितीचे नेते आर. एम. चौगुलेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा म. ए. समितीच्या लक्ष्मी यळगूकर यांची अध्यक्षपदी व शंकर सुतार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यळगुकर यांना १४ मते पडली तर विरोधी गटातील सुचिता सांबरेकर यांना ११ मते पडली व एक मत बाद झाले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शंकर सुतार यांना १४ मते तर राजश्री तोरे यांना १२ मते पडली. म. ए. समितीच्या विजयामुळे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर घोषणाबाजी आणि एकच जल्लोष पाहायला मिळाला.



यावेळी आर. एम. चौगुले यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन करून समितीच्या पाठीशी राहून मतदान केलेल्या सदस्यांचे आभार मानले. समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला.