सौंदत्ती / वार्ताहर
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील सौंदत्ती रेणुका अर्थात यल्लमा देवी मंदिराची हुंडी मोजणी पूर्ण झाली असून मंदिरात मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे. यामध्ये १७ मे ते ३० जून या ४५ दिवसांच्या कालावधीत मंदिराच्या हुंडीत १ कोटी ३० लाख ४२ हजार रुपये रोख, ४.४४ लाख रू. किमतीचे सोने, २.२९ लाख रू. किंमतीचे चांदीचे दागिने अशी एकूण १.३७ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. ही रक्कम रिंगरोड आणि वसतिगृहाच्या बांधकामासह भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती यल्लमा देवी मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसपीपी महेश यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यल्लमा मंदिर, बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, धार्मिक बंदोबस्त विभाग,सौंदत्ती तहसीलदार कार्यालय आणि सिंडिकेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दि. ५, ६ आणि १२ जुलै रोजी हुंडी मोजून पूर्ण केली.
यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य वाय. वाय. कलप्पनवर, अभियंता ए. व्ही. मोल्लूर, मजुराई विभागाचे सहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ, अधीक्षक संतोष शिरसंगी, निरीक्षक शितल कदत्ती, एम. एस. यलीगार, ए. पी. द्यामनगौडर, अल्लमप्रभू, प्रभुनावर, व्ही. राजूवर, व्ही. नंदा, प्रभू हंजगी, एम. एम. माहुत उपस्थित होते.
0 Comments