बेळगाव / प्रतिनिधी 

पावसाळा सुरू होताच बेळगाव शहरातील स्मार्टसिटीच्या कामांचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर येत आहे. याचे उत्तम उदाहरण बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघाला जोडणाऱ्या जुन्या पीबी रोडवर पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीची कामे अशास्त्रीय पद्धतीने केल्यामुळे पाणी साचून राहत आहे. येथील सीडीवर्क केलेल्या भागातही मोठा खड्डा पडल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यात पडून हलगा (ता. बेळगाव) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या आठ दिवसांपूर्वी या रस्त्यावरून अवजड वाहतूक करणारे वाहन गेल्याने हा खड्डा पडल्याचे एका रिक्षा चालकाने सांगितले असून प्रवासी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिकेने येथील काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.