- दिवसभरात १२० मि.मी. पावसाची नोंद
- चिगुळे संपर्क रस्ता पाण्याखाली : जनजीवन विस्कळीत
खानापूर / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून खानापूर तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. आज गुरुवारीही संततधार पाऊस सुरू असल्याने कणकुंबी पर्जन्यमापन केंद्रात दिवसभरात १२० मि. मी. म्हणजे ५ इंच पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास उद्या शुक्रवारी सकाळपर्यंत जवळपास २०० मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिणामी आज गुरुवारी दिवसभरात झालेल्या पावसामुळे जांबोटी,कणकुंबी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. प्रामुख्याने कणकुंबी मंदिरापासून चिगुळे पर्यंत जाणारा संपर्क रस्ता पाण्याखाली गेला आहे. रामेश्वर मंदिर पासून पावसाचा मोठा लोंढा येत असल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून या रस्त्यावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जांबोटी, कणकुंबी, चोर्ला मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गटारींचे नियोजन नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. तळावाडी भागातील पुलावर पाणी आल्याने कणकुंबीला येणाऱ्या शाळकरी मुलांना घरीच बसावे लागले.
अशाच प्रकारे लोंढा, गुंजी हेम्माडगा येथेही जोराचा पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हालात्री नदीवर गुरुवारी पुन्हा पाणी आल्याने हा मार्ग पुन्हा बंद झाला आहे. परिणामी या भागातील जवळपास ४० गावांना बेटाचे स्वरूप आले असून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
याशिवाय गुंजी, हिरावळा संपर्क रस्त्यावर पाणी आल्याने हिरावळे गावचा संपर्कही तुटला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने मलप्रभा नदीलाही पुरेपूर पाणी आले असून असाच पाऊस सुरू राहिल्यास महापुराची भीती नाकारता येत नाही.
0 Comments