• तब्बल चार लाखांचा मुद्देमाल जप्त
  • सीसीबी पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील सदाशिवनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये धाड घालून सीसीबी पोलिसांनी बनावट मद्यविक्री प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार त्यांनीही कारवाई केली. हसन साहेब बेपारी (वय २२ रा.उज्ज्वलनगर, बेळगाव) आणि राजेश केशव नायक (वय ४१,रा. विजयनगर, हिंडलगा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ४ मुद्देमालामध्ये विविध ब्रॅण्डच्या बनावट दारूच्या बाटल्या, वाहतुकीसाठी वापरलेली कार, २१,५०० रु. किमतीचे चार मोबाईल फोन आणि रोख १७,००० यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार,अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गोवा आणि कर्नाटक राज्यात तयार होणाऱ्या अत्यंत कमी किमतीच्या दारूवर रासायनिक प्रक्रिया करून बनावट उंची दारू तयार करत होते.उंची दारूच्या बनावट बाटल्या गोळा करून त्यावर उंची ब्रँडचे लेबल लावत त्याच ब्रँडच्या बॉक्समध्ये त्या बनावट दारूच्या बाटल्या भरून ते विक्री करत होते.

मूळ कंपनी आणि सरकारच्या परवानगीशिवाय परवाना नसताना अनधिकृत पद्धतीने बनावट मद्य विकून ते मोठ्या प्रमाणात पैसा कमवत होते. पण सरकार आणि जनतेची फसवणूक करणारा हा प्रकार योग्य नसल्यामुळे शहर सीसीबी पोलिसांनी धाड घालून आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी आरोपींचे दोन साथीदार  जावेद बेपारी व नागेश  हे दोघेही फरार असून लवकरच त्यांनाही अटक केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे  पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्यासह सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.या प्रकरणाची बेळगाव शहर पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.