• माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांची मागणी 

चंदगड / प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये डीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांना प्रथम प्राधान्य द्या, अशी मागणी माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी केली आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. राज्य शासनाने या जागी सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा फटका डीएड अभ्यासक्रमपूर्ण करून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना बसणार आहे. दीर्घकाळ सेवेच्या काळात पगार आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन असल्यामुळे त्यांच्यापेक्षा बेरोजगारांना खऱ्या अर्थाने कामाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने याबाबत संवेदनशील पणे विचार करून बेरोजगारांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे विद्यार्थी संघटक रामजी कांबळे यांनीही याच मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.