• अन्यथा न्यायालयासमोर रास्तारोको
  • खानापूर वकील संघटनेचा इशारा 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर बेळगाव या राष्ट्रीय महामार्गावर खानापूर शहर परिसरातून जाणाऱ्या दैनंदिन बसेस व शटल बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह उद्यमबाग किंवा इतर भागात कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वेळेवर तसेच नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

खानापूर भागातून दररोज ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक व नोकरदार खानापूर ते बेळगाव व पुन्हा खानापूर असा प्रवास करतात.वेळेत बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर नोकरदार वर्गालाही कामावर वेळेत पोहोचता येत नाही. याकरिता दर अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास सर्वांची सोय होईल. यासाठी केएसआरटीसी बेळगाव आगारप्रमुखांना वेळोवेळी निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात आली आहे. मात्र यावर अद्यापही कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय शिल्लक नाही. तेव्हा १४ जुलै पर्यंत दर अर्ध्या तासाला एक अशा प्रकारे शटल बससेवा सुरू न केल्यास न्यायालयासमोर रास्तारोको करण्याचा इशारा वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, वरिष्ठ वकील हिंदुराव ना. देसाई, चेतन मणेरीकर गजानन देसाई, सादिक नंदगडी, जी. जी. पाटील, व्ही. एन. पाटील, राजेश्वरी हिरेमठ,मदन देशपांडे, राजू आंद्रादे, आय.बी.लंगोटी विजय हिरेमठ, मारुती कदम व इतर वकिलांनी दिला आहे.