- खासगी भाजी मार्केटच्या बांधकामाची चौकशी अन् भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
- महापालिका आयुक्तांना सादर केले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात उभारलेल्या खाजगी भाजी मार्केटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्केटला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एपीएमसी मार्केटमधील घाऊक भाजी विक्रेत्यांनी आज बेळगाव महापालिकेसमोर आंदोलन केले.
महामार्गालगत खाजगी भाजी मार्केटची इमारत बांधण्यात आली असून त्याची चौकशी करून महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना सादर केले.
कायद्यात तरतूद नसतानाही शहरात गांधीनगरनजीक जय किसान खासगी घाऊक भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. सदर भाजी मार्केटची इमारत बांधल्यानंतर महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी राजकारण्यांच्या दबावाखाली परवानगी दिल्याचा आरोप आंदोलक व्यापाऱ्यांनी केला. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एपीएमसी मार्केट मधील घाऊक भाजीपाला व्यापारी गजानन शहापूरकर म्हणाले, शहरात शासकीय एपीएमसी मार्केट असले तरी खासगी भाजी मार्केट होते. मागील सरकारच्या काळात ते स्थापन केले. तत्कालीन सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली हे खासगी भाजी मार्केट उभारण्यात आले होते. यात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही काही चुका झाल्या आहेत. आता नवीन सरकार सत्तेवर आले आहेत. तसेच नवे महापालिका आयुक्त आले आहेत. त्यामुळे येथे असलेल्या सुमारे २०० व्यापाऱ्यांनी खासगी मार्केट बंद करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी आणि एक व्यापारी सदानंद पाटील म्हणाले, एपीएमसीमध्ये घाऊक भाजी मार्केट असूनही मागील सरकारच्या काळात एका मोठ्या राजकारण्याच्या सहकार्याने हे खासगी भाजी मार्केट उभारण्यात आले होते. याबाबत आम्ही यापूर्वीच्या सरकारकडे अनेकदा दाद मागितली असली तरी त्यांनी दुर्लक्ष केले. परवानगी न घेता सर्वसामान्य नागरिकांनी घरे बांधल्यास की पाडण्यास तत्पर असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगी मार्केटला रातोरात परवानगी दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सर्व भ्रष्टाचाराची सर्वकष चौकशी करून, आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही येथे आंदोलन करत आहोत, या प्रकरणात कसा अन्याय झाला, याचे २५ मुद्दे आम्ही काढले आहेत. नवीन सरकारकडून न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही येथे आलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी घाऊक भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments