• कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा एकमुखी निर्णय; सामाजिक एकात्मतेचा दिला संदेश

निपाणी (प्रतिनिधी) :  हिंदू धर्मियांच्या जिव्हाळ्याचा सण आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद एकाच दिवशी गुरुवारी (ता.२९) आल्यामुळे आषाढीचे पावित्र्य राखत ईदची कुर्बानी आषाढीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.३०) करण्याचा एकमुखी निर्णय निपाणी मधील मुस्लिम समाज बांधवांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत घेतला आहे.

निपाणी भागातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा परंपरेचा विचार करून बकरी ईद सणादिवशी ईदगाह मैदान येथे केवळ ईदची विशेष सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

येथील बागवान गल्लीतील पुरातन विठ्ठल मंदिरात विठुरायाची पूजा पहाटे होते. या निमित्ताने हिंदू समाज बांधव यांना उपवास असतो. त्यादिवशी बकरी ईद असल्याने कुर्बानीच्या कार्याने हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर तसेच आषाढी एकादशीचे पावित्र्य जोपासून हिंदू- मुस्लिम एकता व अखंडता वृद्धिगंध करण्यासाठी मुस्लिम समाजाने पहिल्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी अन्वर बागवान, दोस्तमहंमद पठाण, इलियास पटवेगर, फारुख गवंडी, शेरू बडेघर, शेरगलखान पठाण, बख्तीयार कोल्हापूरे, जुबेर बागवान, मैनुद्दीन मुल्ला, इरफान महत, अल्लाबक्ष बागवान, अस्लम शिकलगार, शरीफ बेपारी, जावेद काझी, सैफुल्ला पटेल, रियाझ बागवान, समीर सय्यद, महम्मद खानापूरे, नजीर शेख, वाहिद मूजावर,

के. एम. वठारे, नजीर कोच्चारगी, खलील बागवान, नजीर पकाली, शरीफ बेपारी,जब्बार बेपारी, फारुख पटेल, झाकीर कादरी, जरारखान पठाण जावेद कूमनाळे यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.

----

हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश

 स्थानिक मुस्लिम समाज बांधवांनी आषाढी एकादशीचे पावित्र्य जोपासून कुर्बानी दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेऊन हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिला आहे. इतर तालुक्यांसाठी हा निर्णय एक प्रकारे प्रेरणादायी ठरणार आहे. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच समाज बांधवातून कौतुक होत आहे.