- नंदगड येथे विविध संस्था प्रतिनिधींवर दंडात्मक कारवाई
- कृषी विभागाची करडी नजर
खानापूर / प्रतिनिधी
रासायनिक खतांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या सहकारी संस्था व खाजगी खत विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे. मंगळवारी कृषी विभागाचे सहाय्यक निर्देशक डी.बी. चव्हाण यांनी खानापूर तालुक्यातील रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या विविध दुकानांना भेटी देऊन अधिक दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदार व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नंदगड मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक भूषण पाटील हे अधिक दराने युरिया तसेच १०.२६.२६ हे रासायनिक खत विकत असल्याचे पावती कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.
त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी नांगड मार्केटिंग सोसायटीच्या गोडाऊन मधील खत साठ्याची पाहणी केली. विक्रीतील तफावतीबाबत सदर व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याचे उत्तर मिळेपर्यंत खत विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यात अनेक सहकारी पतसंस्था तसेच मार्केटिंग सोसायटींकडे रासायनिक खत विक्रीचे परवाने आहे. शिवाय खाजगी खत विक्रीचे परवाने असणाऱ्या दुकानदारांची ही संख्या मोठी आहे.
मात्र अनेक दुकानांमध्ये रासायनिक खतांची विक्री अधिक दराने होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन कृषी सहाय्यक निर्देशक यांनी ही कारवाई केली आहे.
मंगळवारी दिवसभरात तालुक्यातील अनेक परवानाधारक दुकाने तसेच सहकारी संस्थांच्या गोदामातील साठ्याची व विक्री संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments