बेळगाव /  प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी आज मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. महापालिकेचे मावळते आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे नगरसेवक, महापालिकेच्या कर्मचारी संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांच्यासह म. ए. समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि नगरसेविका वैशाली भातकांडे यांनीही नूतन महापालिका आयुक्तांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्वागत आणि शुभेच्छा स्विकारल्यानंतर अशोक दुडगुंडी म्हणाले, महापालिकेत चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आपल्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यापूर्वीही मी बेळगाव महापालिकेचे कामकाज हाताळले आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी संघटित होऊया असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली.  

याप्रसंगी उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी आदी उपस्थित होते.नूतन मनपा आयुक्त अशोक दुडगुंडी यांची  दुसऱ्यांदा बेळगाव महाआयुक्तपदी वर्णी लागली आहे. यापूर्वीही जवळपास २ वर्षे त्यांनी बेळगाव महापालिका आयुक्त म्हणून सेवा बजावली होती.

दरम्यान मावळते आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची बदली झाली असली तरी त्यांची अद्याप दुसरीकडे नियुक्ती झालेले नाही. नियुक्ती होईपर्यंत त्यांना राजधानी बेंगळूर  येथे हजर रहावे लागणार आहे.