• जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याचा दिला आदेश 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील एसपीएम रोडवर रेणुका हॉटेलनजीक फुटपाथखाली भूमिगत जलवाहिनीला लागलेल्या गळतीची आज महापौर शोभा सोमनाचे यांनी पाहणी करण्याबरोबरच जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याचा आदेश दिला.

एसपीएम रोडवर रेणुका हॉटेल जवळ भूमिगत जलवाहिनीला गेल्या दोन आठवड्यापासून गळती लागली आहे त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी फूटपाथवर वाहून वाया जात होते यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार करून देखील पाणीपुरवठा विभागाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. सध्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडत असल्यामुळे या पाणी गळतीची माहिती मिळताच महापौर शोभा सोमनाचे यांनी आज गुरुवारी सकाळी एसपीएम रोड येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जलवाहिनी दुरुस्ती करून सदर पाणी गळती तात्काळ थांबवण्याचा आदेश दिला. याप्रसंगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.