• निकृष्ट दर्जाचे धान्य व गैरसोई पाहून व्यक्त केला संताप

बेळगाव / प्रतिनिधी

हलगा (ता. बेळगाव) येथील महिला पूरक उत्पादन केंद्राला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी  गुरुवारी अचानक भेट दिली. गरोदर महिला आणि अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या या केंद्रातील निकृष्ट दर्जाचे धान्य व गैरसोई पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाहणी दरम्यान निकृष्ट दर्जाचे अन्न साठवल्याचे आढळून आले तसेच संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा अभाव पाहून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. मंत्री हेब्बाळकर यांनी अचानक भेट दिल्यामुळे महिला पूरक उत्पादन केंद्रातील सर्वांचेचं धाबे दणाणले. एकूणच येथील सर्व परिस्थिती पाहता शासनाच्या पौष्टिक आहार देण्याच्या मूळ उद्देशालाच येथे तडा गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महिला व बालकल्याण खात्याची मंत्री म्हणून मी ही गैरसोय पाहून स्वस्थ बसू शकत नाही.  गरोदर महिला व बालकांना पोषक आहार मिळण्याबरोबरच योजनेचा उद्देश सफल झाला पाहिजे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे योजना अयशस्वी होऊ नये. लहान मुले गरोदर स्त्रिया यांना अन्यायकारक वागणूक मिळू नये, याकरिता मी राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला पूरक उत्पादन केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी पाहणी करणार आहे.

तसेच हलगा येथील संबंधित केंद्रातील पाहणी दरम्यान आढळलेली परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून व्यवस्थित मुलाखत बदल घडवून आणण्यासाठी कार्यवाही करेन, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.