• मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
  • कृष्णा निवासस्थानी पार पडली आढावा बैठक

बेंगळूर दि. 14 ऑक्टोबर :

राज्यात जनावरांच्या त्वचेवरील लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या कृष्णा या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, उपचार आणि मृत जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी एकूण १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सदर निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाला दिल्या.

मृत गायीच्या नुकसान भरपाईसाठी आधीच २ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली असून ५ कोटी रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. जनावरांवर उपचार आणि लसीकरणासाठी एकूण ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सदर रोगाची लागण २८ जिल्ह्यातील १६० तालुक्यातील ४३८० गावांमधील जनावरांमध्ये झाली आहे. एकूण ४५६४५ जनावरांना या रोगाची लागण झाली असून यापैकी २६१३५ जनावरे बरी झाली आहेत. मात्र २०७० जनावरांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत ६.५७ लाख जनावरांचे लसीकरण झाले असून भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५ कि.मी. परिसरातील निरोगी जनावरांचे लसीकरण करावे, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. हा आजार गंभीर असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने लसीकरण करण्याची सूचना करण्याबरोबरच लसींचे १५ लाख डोस तातडीने उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना लसीच्या पुरवठ्याबाबत भारत सरकारने मान्यता दिलेल्या कंपन्यांशी बोलणी करून लस पुरविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मृत जनावरांसाठी आतापर्यंत २ कोटी. ४६ .१५ लाख दिले असून उर्वरित भरपाईचे त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले.

कोलार जिल्ह्यात या आजाराची समस्या गंभीर असून तेथील रोग नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. इतर जिल्ह्यांमध्ये पसरू नये यासाठी खबरदारी घ्यावी. लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.यावेळी पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन मंजुनाथ प्रसाद, वित्त विभागाचे सचिव पी. सी. जाफर, पशुसंगोपन आणि पशुवैद्यकीय विभागाचे सचिव सलमा फहिम आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.