• तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाची अवस्था
  • रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो व्हायरल 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटवर उभारलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन  खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उड्डाणपुलाचा शानदार सोहळा पार पडला.

मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो व्हायरल झाले असून उड्डाणपुलाच्या कामबाबत चौफेर टीका होत आहे.

तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेटवरील उड्डाणपूल उदघाट्नच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली  वाहतूक यासाठी शहरात उभारण्यात आलेले उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीपेक्षा समस्यांचेच कारण बनले आहेत.

तिसऱ्या रेल्वे गेटवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्यावर खड्डे दिसून आल्याने कामात घोटाळा झाला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करतानाच उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.