बेळगाव / प्रतिनिधी 

पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी  जायंट्स सखीच्यावतीने जायंट्स सखी आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात येतो. आजपर्यंत वेगवेगळ्या शाळांच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी सुध्दा वेगळेपण जपण्याचा प्रयत्न जायंट्स सखीने केला असून बेळगाव शहर आणि परिसरातील महिला क्रीडा शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

जिजामाता हायस्कूलच्या गीतांजली मंडोळकर, मराठी विज्ञानिकेतनच्या पूजा संताजी, डीपी स्कुलच्या सिल्व्हीआ डी'लिमा, सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या साधना भद्री आणि महिला विद्यालयच्या विजयमाला पाटील या महिला क्रीडा शिक्षिकांना जायंट्स सखी आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा आदर्श शिक्षक पुरस्कार  गौरव सोहळा सोमवार दि.५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी चार वाजता जायंट्स भवन कपिलेश्वर रोड येथे संपन्न होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील तालुका प्राथमिक शिक्षणाधिकारी जाहिदा पटेल या उपस्थित राहणार आहेत असे अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी कळविले आहे.