आझाद गल्लीतील मोहन बडमंजी, परिवाराने

साकारलाय आकर्षक देखावा


बेळगाव / प्रतिनिधी 

देशरक्षणासाठी , स्वतःचे प्राण तळहातावर घेत सीमेवरती अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, ही म्हण सैनिकांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराला अनेक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. प्रथम उमेदवाराच्या धावण्याची क्षमता पाहण्यात येते. यानंतर उमेदवार पात्र ठरल्यास त्याची  संबंधित कार्यालयात नोंदणी होते. पुढे अडथळा शर्यत, दोरीच्या साह्याने उंच ठिकाणी चढणे या चाचण्यांमध्ये उमेदवाराला स्वतःला सिद्ध करावे लागते. यानंतर फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कसम परेड होते आणि अखेरीस देशसेवेसाठी जवान तयार होतो.


सैन्यामध्ये भरती होण्याची प्रक्रिया आपण आज पर्यंत पुस्तकांमध्ये वाचली असेल पण एक सैनिक कसा घडतो हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आझाद गल्ली, बेळगाव येथील मोहन शंकर बडमंजी आणि परिवाराने श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून आपल्या निवासस्थानी बाप्पांच्या स्वागतासाठी केलेल्या ट्रिक सीनच्या माध्यमातून त्यांनी या निवड प्रक्रियेचे यथार्थ दर्शन घडविले आहे.