6 दिवसांपूर्वी सापडलेल्या अर्भक प्रकरणाला वेगळे वळण
खानापूर तालुक्यातील नेरसा–गवळीवाडा येथे सहा दिवसांपूर्वी सापडलेल्या अनाथ अर्भकाच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करून तिच्यापासून जन्मलेल्या मुलाला सोडून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
एका स्थानिक तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. या फसवणुकीतून संबंधित मुलगी गरोदर राहिली. अशाप्रकारे जन्मलेल्या मुलाला सोडून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी खानापूर पोलिसांनी मालू अप्पू पिंगळे (१९) याला अटक केली आहे. तोदेखील गवळीवाडा-नेरसा येथील रहिवासी आहे.
खानापूर येथील शासकीय रुग्णालयात तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 (पॉक्सो) अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरसा-गवळीवाडा येथे 25 ऑगस्ट रोजी सकाळी एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या पिशवीत एक दिवसाचे बाळ आढळून आले. याबाबत महिला व बालकल्याण विभागाने अर्भकाला रुग्णालयात दाखल करून पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
0 Comments