बेळगाव / प्रतिनिधी
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह, रोख रक्कम लंपास केली. शहराच्या वीरभद्रनगर 3 रा.क्रॉस येथील सुभानी सनदी यांच्या घरी घडलेली ही चोरीची घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वीरभद्र नगर तिसरा क्रॉस येथील सुभानी सनदी हे शुक्रवारी रात्री वीरभद्रनगर सातवा क्रॉस येथील नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सोन्याचा हार, कर्णफुले, अंगठ्या असे अडीच लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते फरार झाले.
शनिवारी सकाळी 11 वाजता सुभानी सनदी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी स्थानिक नगरसेवक आणि मार्केट पोलिस स्थानकाला घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी श्वानासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments