- अपघातात क्रुझर चालक जागीच ठार :12 जण जखमी
बागलकोट /वार्ताहर
क्रुझर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात क्रुझर चालक जागीच ठार तर अन्य बारा जण जखमी झाले. ही घटना बागलकोट जिल्ह्याच्या बदामी तालुक्यातील हुलगेरी क्रॉसनजीक घडली.
प्रकाश बडीगेर (रा.मुधोळ) असे मृत क्रुझर चालकाचे नाव आहे. तर मल्लाप्पा चिनगोंड, मंजुनाथ चिनगोंड, सोमनाथ हेब्बाळ, सिध्दप्पा पंचगावी, श्रीशैल मठपती, बसवराज जोगी,आनंद मुतगी, मुत्कप्पा हेब्बाळे, मुत्कप्पा कारजोळ, बाबू नदाफ अशी जखमींची नावे आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी बागलकोटच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार क्रुझरमधून 13 जण काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसानिमित्त मुधोळहून दावणगिरी कडे निघाले होते. याच दरम्यान बदामी हुन बागलकोटकडे निघालेल्या ट्रकला हुलगेरी क्रॉस नजीक क्रुझरची जोरदार धडक बसून हा अपघात झाला. माहिती मिळताच बागलकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख जयप्रकाश यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
मंत्री गोविंद कारजोळ यांनीही व्यक्त केला शोक
कर्नाटकचे जलसंपदामंत्री गोविंद कारजोळ यांनीही या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत प्रकाश बडिगेर (क्रुझर चालक) याच्या आत्म्यास शांती लाभो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
0 Comments