टायर पेटवून शेतकऱ्यांची निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील कणबर्गी येथील बुडाच्या नियोजित वसाहत योजनेला सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज कणबर्गी रस्त्यावर टायर पेटवून अचानक आंदोलन केले.
बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या कणबर्गी येथील नियोजित निवासी वसाहत योजनेला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र राज्य सरकारने या योजनेला नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्याचा निषेध करत शेतकऱ्यांनी आज, शुक्रवारी सकाळी कणबर्गी रस्त्यावर टायर पेटवून निदर्शने करत संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने बेळगाव-कणबर्गी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. डीसीपी रवींद्र गडादी, माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
बुडा योजना क्र. 61 मध्ये बेळगावच्या बाहेरील भागातील कणबर्गी येथे 159 एकर शेत जमीन संपादित करून त्यावर निवासी वसाहत विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जमिनीच्या संपादनाविरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 159.23 एकरपैकी 50 एकर 18 गुंठे जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. या परिसरात 200 हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. घरे बांधणाऱ्यांना एनओसी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना सरकारने योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमचा संघर्ष इथेच थांबत नाही. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
एकंदरीत, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्य शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. शेतकर्यांचा संघर्ष भविष्यात काय रूप धारण करेल याची वाट पहावी लागेल.
0 Comments