बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या जाधवनगरमध्ये आज बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. जाधवनगर येथील एका बांधकाम मजुरावर बिबट्याने हल्ला केला असता केवळ दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाधवनगर, बेळगाव येथे आज अचानक प्रकट झालेल्या बिबट्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर सिद्धराय लक्ष्मण निलजकर व अन्य बांधकाम मजूर काम करत होते. त्यांच्यासमोर बिबट्या दाखल झाला.
हे पाहून काम करणारे कामगार घाबरून सैरावैरा पळत सुटले. याच दरम्यान, बिबट्याने एका बांधकाम मजुरावर हल्ला केला. त्याच्या पाठीवर बिबट्याने वार केले. सुदैवाने बांधकाम कामगार व लोकांना पाहून बिबट्या पळून गेला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि वन विभागाचे कर्मचारी तसेच एपीएमसी पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आजूबाजूच्या घरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्या आडवा आल्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले.
0 Comments