नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना मंत्री उमेश कत्ती 
 
               डोणी नदीच्या पूरग्रस्त भागाची केली पाहणी

विजयपूर / प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे विजापूर जिल्ह्यातील डोणी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या भागातील शेत शिवाराला पाण्याने वेढले आहे. परिणामी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाला पालकमंत्री उमेश कत्ती यांनी आज भेट दिली.


तिकोटा तालुक्यातील धन्याळ, दाशाळ आणि हरनाळ या गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. तसेच नुकसानीचा सर्वे करून लवकरात लवकर माहिती पाठवण्याची सूचनाही त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.



पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती यांनी पूरग्रस्तांना पुरेशी नुकसान भरपाई दिली जाईल. त्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा असून निधीची कमतरता नसल्याचे सांगितले. तसेच पूर आल्याने डोणी नदीतील गाळ काढण्यासाठी पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी विजय महांतेश दानम्मनवर, जिल्हा पोलीसप्रमुख एच.डी. अनंतकुमार, विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील, भाजप नेते व सेंद्रिय बियाणे महामंडळाचे अध्यक्ष विजूगौडा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.