अथणी येथील घटना 


अथणी / वार्ताहर

अथणी येथे श्रावण महिन्याच्या पूजे निमित्त कृष्णा नदीत पवित्र स्नान करून देवाला पाणी नेण्यासाठी गेलेला युवक  चुकून पाण्यात पाय घसरून बुडाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोहता येत असूनही, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील कागदजी गल्लीचा रहिवासी सागर राजू होनकट्टी नावाचा 23 वर्षीय युवक कृष्णा नदीवर श्रवणानिमित्त आंघोळ करून देवपूजेसाठी पाणी आणण्यासाठी गेला होता. मात्र अंघोळ करताना अचानक पाय घसरून तो पाण्यात बुडाला आणि पाहता-पाहता दिसेनासा झाला. हे पाहून त्याच्यासोबत आंघोळीसाठी आलेल्या तरुणांना धक्काच बसला. नदीपात्रात सर्वत्र शोध घेऊनही सागर सापडला नाही, तेव्हा त्यांनी इतरांना हा प्रकार सांगितला. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी कुमार होनकट्टी यांनी सांगितले की, सागर होनकट्टी नावाचा 23 वर्षीय तरुण श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर कृष्णा नदीवर स्नान करण्यासाठी आणि देवपूजेसाठी पाणी आणण्यासाठी आला होता तेव्हा ही दुर्घटना घडली. अथणी तालुक्यातील हल्याळ – दरुर पुलावर ही घटना घडली असून, पोहता येत असतानाही सांगत अचानक पाण्यात वाहून गेला कुमारने सांगितले.

या घटनेबद्दल बोलताना अग्निशमन दलाचे अधिकारी राजू तळवार यांनी सांगितले की, पाच मित्र येथे आले होते. त्यांनी नदीत आंघोळ केली. नदीच्या काठावर पूजा करताना त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा सागर गायब झाला होता.  घाबरून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. या घटनेची माहिती मिळताच आम्ही अग्निशमन दलाचे 6 कर्मचारी आलो. आराखडा काढून तपासणी केली, मात्र ती व्यक्ती सापडली नाही. आता बोट आणून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

एकंदर, श्रावण महिन्यात देवाची पूजा करण्यासाठी नदी स्नानाला गेलेला एक तरुण पाण्यात वाहून गेला ही दुःखद घटना आहे. त्यामुळे नदीत आंघोळीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य तितक्या काळजीपूर्वक वागून आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपण जागरूक असले पाहिजे.