बेळगाव / प्रतिनिधी

मिरज माहेर मंडळाची ऑगस्ट महिन्यातील मासिक सभा नुकतीच सौ.अस्मिता आळतेकर यांच्या वडगाव येथील घरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी किर्लोस्कर रोडवरील जिम कम योगा संचालिका, योगशिक्षिका राधिका बर्वे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

वयाच्या पन्नाशीनंतर शरीराची, आरोग्याची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांनी योगाची काही प्रात्यक्षिके करुन दाखवली.चेहरा नेहमीच ताजातवाना रहावा यासाठी चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी  फेशियलबरोबर व्यायामाची देखील गरज असते असे सांगताना त्यांनी चेहरा व मानेसाठी विविध व्यायामाचे प्रकार दाखवले.जेवणाच्या योग्य वेळा,आहारातील काही महत्वाच्या टिप्स,योग्य डाएट याची त्यांनी सोप्या पद्धतीने माहिती सांगितली.आळतेकर यांच्या घरी मिरज माहेर मंडळातील काही मैत्रिणीं चे वाढदिवस साजरे करण्याबरोबरच  श्रावणातल्या हळदीकुंकुचा आनंदही भगिनींनी मनसोक्त लुटला.