विजयपूर / दिपक शिंत्रे
भूकंप संदर्भात विजयपूर जिल्हा सुरक्षित असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जायचा. मात्र गेल्या वर्षभरात या भागात सुरु असलेल्या भुकंम्पाच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सरकारने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असा आग्रह या भागातील नागरिकांकडून होत आहे.
विजयपूर जिल्हा हा काळ्या खडकावर उभा असणारा जिल्हा आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे देखील तेच आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात झालेल्या भूकंपांचा सौम्य धक्का मुळे विजयपूरातील जनतेची चिंता वाढली आहे. वारंवार भूकंपाचे धक्के कशामुळे बसत आहेत याचे नेमके कारण अजून माहित होऊ शकले नाही. गेल्या वर्षभरात विजयपूर जिल्ह्यात १७ हुन अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यासंदर्भात भूवैज्ञानिकांनी शेअर केलेला एक ऑडिओदेखील वायरल झाला असून या ऑडिओमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांनी भूकंपाची तीव्रता आणखी वाढू शकेल, असेही स्पष्ट केले आहे, या ऑडिओनंतर पुन्हा नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
भूकंपांची वैज्ञानिक कारणे, संदर्भ भूवैज्ञानिकांनी व्यक्त केले आहेत. जमिनीतील दगडांची हालचाल, संघर्ष आदी कारणे असल्याचे नमूद करून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
तज्ज्ञांना बोलावून सिस्मोमीटर बसविण्यात आले असून यासंदर्भात तज्ज्ञांची पत्रकार परिषद बोलावून तज्ज्ञ जगदीश यांनी भूकंपाला पाऊसच कारणीभूत असल्याची माहिती दिली. पावसाचे पाणी साचून आणि जमिनीत शिरल्यामुळे पृथ्वीचे थर थरथरत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून संपूर्ण अभ्यासानंतर नेमकी माहिती मिळेल, परंतु जनतेने घाबरण्याची गरज नाही, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
विजयपूर जिल्ह्याला बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांसंदर्भात तज्ज्ञ समितीने जनतेला घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन करूनही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments