बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील जाधव नगर परिसरात गेल्या 21 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अद्यापही यश आले नाही. हा बिबट्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने हुलकावणी देत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणाऱ्या वनविभागाने आता हनीट्रॅप द्वारे बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला आहे.

बिबट्याने खरोखरच बेळगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. बिबट्याच्या शोधासाठी शिमोगा जिल्ह्यातील सकरेबैल येथून आलेल्या 'अर्जुन' व 'आले' या प्रशिक्षित टस्कर हत्तींच्या सहाय्याने गेले दोन दिवस शोध मोहीम राबवण्यात आली. तरीही बिबट्याला  पकडण्यात अपयश आले असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने हनीट्रॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.