विजयपूरचे जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी.अनंतकुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती
विजयपूर/वार्ताहरविजयपूरमधील चोऱ्यांमध्ये सहभाग असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात विजयपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस प्रमुख एच. डी. अनंतकुमार यांनी कौतुक केले आहे.
विजय कराडे (वय 23, रा. इटंगीहाळ), आनंद धोरे (रा.इटंगीहाळ), सचिन मधु धोपडे (वय 20, रा. बबलाद ता.जत, जि. सांगली), नवनाथ कराडे (वय 20, रा. तिकुंडी करेवाडी, ता. जत जि.सांगली),सचिन विलास काळे (वय 20, रा. तिकुंडी करेवाडी, ता. जत जि.सांगली), विलास धाणे (वय 20, रा. तिकुंडी करेवाडी, ता. जत जि.सांगली), हणमंत खरात,(वय 20 रा.इटंगीहाळ, जि. विजयपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य तीन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी.अनंतकुमार म्हणाले की, विजयपूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू होते. गेल्या आठवडाभरात शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या करून आरोपींनी सोने-चांदी, रोख रक्कम व दुचाकी असा ऐवज लंपास केला होता. चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. याच पार्श्वभूमीवर चोरट्यांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख एच. डी. अनंतकुमार यांच्या नेतृत्वाखाली विजयपूर ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करून तपास हाती घेण्यात आला.







अखेर या पथकाने दि.19.ऑगस्ट रोजी इटंगीहाळ गावाजवळ इकेलेक स्कूल नजीक सात आरोपींना अटक केली. याप्रकरणी कसून चौकशी केली असता, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दि. 8 ऑगस्ट रोजीच्या रात्री 10 वा. ते दि.12 ऑगस्ट रोजी रात्री पर्यंत 3 दुचाकी स्वारांना धमकावून त्यांच्याकडून 3 मोबाईल,रोख रक्कम व दुचाकी असा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 28 हजार रुपयांचे दोन मोबाईल, रोख रक्कम रुपये 8 हजार 200, 4 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाकी असा एकूण 5 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच मिरचीपूड, चाकू, लाकूड ही गुन्ह्यासाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
विजयपूरचे जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी. अनंतकुमार,अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख राम अरसिद्दी, विजयपूरचे डीएसपी सिद्धेश्वर, विजयपूर ग्रामीणचे पीएसआय संगमेश पालभावी, विजयपूर ग्रामीणचे पीएसआय बी.एस.उप्पार, विजयपूर ग्रामीणच्या क्राईम पीएसआय श्रीमती. आर. ए. दिन्नी यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
0 Comments