• नागरिकांची महापालिका आयुक्तांना विनंती

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळूर - मंगळूर महानगरपालिकेची प्रभाग रचना ज्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्याप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील समस्यांचे निवारण करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच महापालिकेची निवडणुक होऊन जवळपास वर्ष होत आले. तरीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजूनही महापौर-उपमहापौर निवडणूक रखडली आहे. सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे प्रभागवार निवडून आलेल्या नगरसेवकांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे  शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. तेव्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका हद्दीत प्रभाग समिती स्थापन करण्याची विनंती नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.