• फॅमिली पेन्शन वाढविण्याची मागणी
  • एलआयसी अध्यक्षांच्या नावे देण्यात आले मागण्यांचे निवेदन

बेळगाव/प्रतिनिधी

विमा कंपन्यांचे निवृत्त कर्मचारी व त्यांच्या वारसांनी आज बेळगावात निदर्शने केली. विमा कंपनी कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शन मध्ये त्वरित वाढ करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

बँकिंग आणि विमा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या  पेन्शनमध्ये त्वरीत वाढ करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला आहे. रिझर्व बँक आणि बँकिंग क्षेत्रात या निर्णयाची अंमलबजावणी याआधीच सुरू झाली आहे. याबाबत एलआयसी आणि जिपसा बोर्डाने सरकारला अनेकवेळा कळवून देखील अजूनही वाडिव फॅमिली पेन्शन देण्यात येत नाही. याच्या निषेधार्थ आणि त्वरित वाढीव पेन्शन देण्याच्या मागणीसाठी  पुकारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. गोवावेस येथील एलआयसीच्या विभागीय कार्यालयासमोर निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी घोषणा देत निदर्शने केली.

यावेळी बोलताना निवृत्त एलआयसी कर्मचारी संघटनेचे नेते जी. व्ही. कुलकर्णी यांनी निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच ते सहा हजार फॅमिली पेन्शन देण्यात येते. त्यांचा आरोग्य आणि वैद्यकीय खर्च पंधरा ते वीस हजारांच्या  घरात आह. इतक्या तुटपुंज्या रकमेत त्यांना कुटुंबाचा निर्वाह आणि आरोग्य खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे एलआयसी बोर्डाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना वाढीव पेन्शन सरकारने द्यावी अशी मागणी केली.

यावेळी एस. एस. धडेद आणि के.सी. नागराज यांनी ही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.  निदर्शनानंतर निवृत्त विमा कर्मचाऱ्यांनी  एलआयसीच्या व्यवस्थापक  गायत्री आणि विभागीय व्यवस्थापक राघवेंद्र इनामदार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ते स्वीकारून वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन राघवेंद्र इनामदार यांनी दिले.

यावेळी एस. एम. कुलकर्णी, एस. आर. पाटील, के. एन. अपर्णा, एस. डी.अगसर, यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव विभागातील चिकोडी, जमखंडी येथील 125 निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. त्यात 50 निवृत्त महिला कर्मचारी, 80 वर्षांवरील 6 तर 91 वर्षाच्या एका कर्मचार्‍याचा समावेश होता.