हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
निवृत्त वनाधिकाऱ्याचे 4 लाख रुपये लुटून पुन्हा त्याच अधिकार्याचे अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे.
21 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर मुत्नाळ गावानजीक निवृत्त वनाधिकाऱ्याला अडवून त्यांच्याकडील चार लाख रुपये लुटण्यात आले होते. यानंतर त्यांचेच अपहरण करून 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात संबंधित विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर आणि सहकाऱ्यांनी लगमाप्पा कोळ्यानाईक (वय 30) रा. शिवाजी नगर बेळगाव, प्रकाश गौरव (वय 26) रा. दुर्गम्मागल्ली मूत्यानट्टी, कल्लाप्पा होण्णागी (वय 29) रा. मारुती गल्ली मूत्यानट्टी, मारुती बर्मानी (वय 20) रा. विठ्ठल गल्ली मास्तमर्डी, विशाल तलवार (वय 23) रा. दुर्गम्मागल्ली मूत्यानट्टी या पाच आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम, 4 लाख रुपयांची स्कॉर्पिओ कार, प्लास्टिक आणि फायबरच्या डमी पिस्तूल, लायटर, चाकू, लोखंडी रॉड ही गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त केली आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
0 Comments