विजयपूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

विजयपूर / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून विजयपूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूअसून चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास शहरातील मल्लिकार्जुन नगर आणि श्रीनगर परिसरातील दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मल्लिकार्जुन नगरातील मल्लनगौडा बिरादार यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत घरातील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाखाची रोकड त्याचबरोबर घरासमोर उभी असलेली स्विफ्ट कार घेऊन ते पळून गेले.

याचप्रमाणे श्रीनगर येथेही डॉ. जी.एम चौगुले यांच्या घरीही चोरी झाली. घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी 20 ग्रॅम सोने व रोख रक्कम चोरून पलायन केले.मात्र या ठिकाणी चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात आदर्शनगर पोलीस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.