( मारहाणीत जखमी झालेले मल्लाप्पा बेळगुंडगी )

विजयपूर / प्रतिनिधी

धूम्रपानाचा त्रास सहन न झाल्याने धूम्रपान करणाऱ्यांना जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीला धूम्रपान करणाऱ्या तिघांनी रॉडच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना कन्नूर (ता. विजयपूर) येथे घडली. मल्लप्पा बेळगुंडगी (रा.कन्नूर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे तर अक्षय जुळजुळी, सुनील माळी आणि रवी अशी मारहाण कर्त्यांची नावे आहेत. या घटनेत जखमी झालेल्या मल्लाप्पा याला अधिक उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मारहाण करणारे तिघेही फरार झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वैजापुर तालुक्याच्या कन्नूर गावातील एका पान शॉपनजीक अक्षय, सुनील आणि रवी हे धूम्रपान करत होते. धुम्रपानामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात    धूर पसरत होता. यावेळी नजीकच उभ्या असलेल्या मल्लाप्पा यांनी  धुराचा त्रास सहन न झाल्याने त्या तिघांना धूम्रपानाचा जाब विचारून या ठिकाणी धूम्रपान करू नका असे सुनावले. याचा राग धरून धूम्रपान करणाऱ्या तिघांनी मल्लाप्पा यांना रॉडच्या साह्याने मारहाण केली. या मारहाणीत मल्लाप्पा हे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना महाराष्ट्रातील सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.