बेळगाव / प्रतिनिधी

2022 मध्ये गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात कार्यक्षमता दाखविणाऱ्या  कर्नाटकातील 6 पोलीस अधिकाऱ्यांना  केंद्रीय गृह विभागाचे पदक प्रदान करण्यात आले आहे. यात बेळगावचे सुपुत्र  हेस्कॉम हुबळी विभागाचे एसपी शंकर  मारिहाळ यांचा समावेश आहे.

लोकायुक्त एसपी के. लक्ष्मी गणेश, हुबळी हेस्कॉम विभागाचे एसपी शंकर के. मारिहाळ, सिंदनूर उपविभागाचे डीवायएसपी व्यंकटप्पा नायका, कर्नाटक लोकायुक्त डीवायएसपी एम.आर. गौतम, कलबुर्गी सीआयडी डीवायएसपी शंकरगौडा पाटील, दावणगेरे जिल्ह्यातील बसवनगर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर एच. गुरुबसवराज यांना 2022 या वर्षासाठी प्रतिष्ठित केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. सध्या हुबळी हेस्कॉम विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले शंकर मारिहाळ हे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे सुपुत्र आहेत.

यापूर्वी त्यांनी बेळगावात मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक, मार्केट उपविभागाचे उपाधीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या काळात  तपासात चांगली कामगिरी बजावली आहे. त्याची दखल घेऊन हे पदक प्रदान करण्यात आले आहे. देशातील एकूण 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाचे पदक जाहीर झाले आहे.