• अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी मात 
  • तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धा  
  • तब्बल १२ वर्षांचा दुष्काळ संपवला  

दुबई : भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत संघाच्या पाया रचला. रोहित शर्माने ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या, तर शुबमन गिलने ५० चेंडूत एका षटकारासह ३१ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवलं. श्रेयस अय्यर ६२ चेंडूत २ चौकार २ षटकारांसह ४८ धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेलने ४० चेंडूत १ चौकार १ षटकारासह २९ धावा करत बाद झाला.  तर राहुल आणि हार्दिकने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात ३४ धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर ठेवत राहुल नाबाद परतला. यावेळी त्याला हार्दिक पंड्याचीही साथ लाभली ज्याने १८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले.

प्रारंभी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा भारताच्या फिरकी चौकडीने आपली कामगिरी चोख बजावली. भारताच्या फिरकी विभागाने चांगली कामगिरी करत धावांवर अंकुश ठेवला आणि न्यूझीलंडला २५१ धावांवर रोखलं. रचिन रवींद्र आणि विल यंगने किवी संघाला अर्धशतकी भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्माची रणनिती आणि भारताच्या फिरकी विभागाने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने ३७ धावा, डॅरिल मिचेलने ६३ धावा आणि ब्रेसवेलने ५३ धावांची खेळी केली.