खानापूर / प्रतिनिधी 

गोदगेरी ता. खानापूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेची स्थापना होऊन ११२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शाळेचा शतकोत्तर तपपूर्ती सोहळा सोमवार दि. १७ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन, गोदगेरी शाळा शतकोत्तर तपपूर्ती सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष बी. जे. बेळगावकर यांनी खानापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.

यानिमित्त सोमवार दिनांक १७ रोजी शतकोत्तर तपोपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम दोन सत्रात होणार आहे.  पहिल्या सत्रात सकाळी ८ वा. गावातून प्रभात फेरी, सकाळी दहा वाजता पसायदान, त्यानंतर राष्ट्रगीत, पाहुण्यांचे स्वागत, स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन, शिक्षक पाहुणे व ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, मराठी शाळा व भाषेच्या संवर्धनासंदर्भात मान्यवर व श्रोतावर्ग यांच्यात व शासन व प्रशासनाला निवेदन अधिक कार्यक्रम होणार आहेत.  

दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वा. मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण व अन्य कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाला खासदार विश्वेश्वर हेगडे - कागेरी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर एमडी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील, तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी व विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.  

सिने अभिनेते शिवप्रसाद पंडित (लोंढा) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शाळेचे आजी-माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती बेळगावकर यांनी दिली. 

यावेळी शतकोत्तर तपपूर्ती सोहळा आयोजन समितीचे पदाधिकारी, निवृत्त बँक मॅनेजर पी. के. नंद्याळकर, गौतम पाटील, माजी ता. पं. सदस्य डॉ. दिगंबर बेळगावकर, निवृत्त शिक्षक तुकाराम जांबोटकर, पीकेपीएसचे संचालक महेंद्र देसाई आदि पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

यावेळी डॉ. दिगंबर बेळगावकर यांनीही आपले विचार मांडले.