• घटप्रभा पोलिसांची कारवाई ; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी 
  • पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद यांची पत्रकार परिषदेत माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

रिअल इस्टेट व्यावसायिक बसवराज अंबी यांच्या अपहरणप्रकरणी घटप्रभा पोलिसांनी एका महिलेसह अन्य दोघांना अटक केली असून, तपास तीव्र करण्यात आला आहे. यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.

सोमवारी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, बसवराज अंबी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली. नंतर ५ कोटी रुपयांसाठी दरोडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सूत्रधार मंजुळा रामगनट्टी (रा.कोन्नूर ; ता.गोकाक) यांच्यासह  जमखंडी येथील परशुराम कांबळे, यमकनमर्डी येथील एन.एस.वालीकर यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात मुख्य आरोपी एन.एस.वालीकर याने आरोपी मंजुळा यांच्या मुलासह बसवराज आंबीचे अपहरण करून ५ कोटी रुपये घेतले. त्यांनी पैशांची मागणी केली. पैसे मिळणार नसल्याची खात्री झाल्याने त्याने अंबी यांच्या हातातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. तपासादरम्यान या अपहरणाचा मास्टर प्लॅन मंजुळा हिनेच रचल्याची माहिती समोर आली आहे. मंजुळा यांचा मुलगा ईश्वर रामगनट्टी याला पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली.

नंतर आरोपी मंजुळा रामगनट्टी हिला अटक करून चौकशी केली असता, या महिलेने राजकीय पक्ष, संस्था, सामाजिक सेवा यांचा गैरवापर करून लोकांची फसवणूक केल्याचे ऐकिवात आले. याआधी गोकाक तालुक्यातील कुलगोड येथील तहसीलदार कार्यालयात दोन जणांना सुमारे पाच लाख रुपये देण्यात आले होते. आरोपी मंजुळाने अनेकांची फसवणूक केली असून राजकीय संधीचा फायदा उचलला आहे. आरोपी मंजुळा रामगनट्टी हिने ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.