- महापालिका प्रशासन नगरसेवकांना सहकार्य करत नसल्याचा आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेत नगरसेवकांऐवजी एजंटांवर अधिक भर दिला जात आहे. महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नसल्याचे सांगत नगरसेवक शंकर पाटील यांनी सोमवारी बेळगाव महापालिकेसमोर उपोषण केले.
जनतेने विकासासाठी नगरसेवक निवडून दिले आहेत. मात्र, स्थानिक लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरसेवकांना महापालिका प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही, केवळ एजंटांचेच ऐकले जात असल्याचे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेळगावात आल्यावर त्यांनी कांगली गल्लीत एक दिवस मुक्काम केला,या स्मरणार्थ बेळगावात महापालिकेच्या जुन्या इमारतीत संग्रहालय आणि वाचनालय बांधण्यात यावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत प्रादेशिक आयुक्तांना पत्र दिले आहे, मात्र त्यांनी आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
गणाचारी गल्लीतील महापालिकेची इमारत जमीनदोस्त झाली असून तेथील डेब्रिज हटवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे, मात्र तसे होत नाही. गणाचारी गल्लीतील सर्व समाजासाठी समुदाय भवन बांधण्यास पालिकेचे अधिकारी दिरंगाईचे धोरण अवलंबत आहेत. एजंटांचा दरबार महापालिकेत वाढला असून नगरसेवकांना किंमत नाही, असे ते म्हणाले.
त्यानंतर महापालिका अधीक्षक गीता कौलगी यांनी नगरसेवक शंकर पाटील यांचे म्हणणे मान्य करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
0 Comments