• जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

रामदुर्ग तालुक्यातील काटकोळ हद्दीत २५ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या शरणाप्पा पत्तार हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. काटकोळ  येथील शंकर जाधव, चिक्कोडी येथील सुलतान किल्लेदार, राहुल बागेवाडी व निप्पाणी येथील टिपू मुजावर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते पुढे म्हणाले, 'सुरुवातीला शरणाप्पाचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज होता. पण पोलीस तपासात हा घातपात असावा अशी शंका आली. कुटुंबियांनी  तसा संशयही व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सर्व तपासाअंती हत्या झाल्याचे निष्पन्न झाले,' 

महाराष्ट्रात राहणारे घाटगे यांच्या मालकीची काटकोळ येथील ७.२ एकर शेतजमीन शंकर जाधव नामक व्यक्ती कसत होते. कसेल त्याची जमीन या कायद्यांतर्गत ती जमीन मिळविण्यासाठी जाधव यांनी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने  घाटगे यांच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, घाटगे यांनी सदर शेत जमीन शरणाप्पा यांना कसण्यासाठी दिली. यावरून शंकर आणि शरणाप्पा यांच्यात झालेल्या भांडणाचे पर्यवसान हत्येमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

शंकरने शरणाप्पा मारण्यासाठी सुलतान किल्लेदार आणि त्याच्या मित्रांना अडीच लाख रुपये दिले होते. तसेच यापूर्वी चार वेळा शरणाप्पाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक आय.आर. पट्टणशेट्टी आणि उपनिरीक्षक बसवराज कोन्नोर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.