बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या जे.आय.बर्गी, उषा आणि रानम्मा मादर या तीन पीडीओ अर्थात भ्रष्ट पंचायत विकास अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई केली जावी, या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघ या संघटनेतर्फे आज शुक्रवारी सकाळी बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे सचिव विलास लक्ष्मण कोलकार यांनी आपल्या मागणी संदर्भात माहिती देताना सांगितले की, बाळेकुंद्री, मारीहाळ वगैरे ग्रामपंचायतच्या पंचायत विकास अधिकाऱ्यांनी अर्थात पीडीओंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अधिकाऱ्यांच्या गैरकृत्या संदर्भात आम्ही वर्षभरापूर्वी तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
बेळगाव तालुक्यातील या भ्रष्ट पीडीओवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज आम्ही या ठिकाणी बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे, असे सांगून जोपर्यंत जे.आय.बर्गी, उषा आणि रानम्मा मादर या तीन भ्रष्ट पीडी ऑवरील कारवाईचे ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा विलास कोलकार यांनी दिला.
डॉ. बी.आर.आंबेडकर शक्ती संघाने छेडलेल्या या आंदोलनात बहुसंख्य कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा सहभाग होता.
0 Comments