• प्रादेशिक आयुक्तांकडून वेळापत्रक जाहीर

बेळगाव / प्रतिनिधी 

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे. १५ मार्चला  बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.  प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर यांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. दुपारी वाजता प्रादेशिक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीची नोटीस काल बुधवारी महापालिकेकडून नगरसेवक आणि पदसिद्ध सदस्यांना पाठविण्यात आली आहे.

बेळगाव महापालिकेच्या विद्यमान महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ १४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे निवडणूक केव्हा जाहीर होणार याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र आता तारीख निश्चित झाल्याने महापौर - उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौर सामान्य महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी चुरस निर्माण होणार आहे. 

भाजपचे दोन नगरसेवक अपात्र ठरल्याने महापालिकेत ५६ नगरसेवक आहेत. महापौर निवडणुकीत खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्यांसह एकूण ६३ जणांची मते आहेत. काँग्रेसचे १०, एमआयएमचे   नगरसेवक निवडून आले आहेत. दोन अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर म. ए. समितीचे तीन नगरसेवक असून ते विरोधी गटात आहेत. महापालिकेतील विरोधी गटनेतेपद काँग्रेसकडे आहे.