बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्य सरकार अल्पसंख्याक आणि हिंदुत्त्वविरोधी अर्थसंकल्प सादर करत असल्याचा आरोप करत, आज बेळगाव भाजपतर्फे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी फलक हाती घेऊन जोरदार घोषणा देत राज्य अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला. 

काँग्रेस सरकारने तुष्टीकरणाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना न दिल्याने केवळ एकाच समाजाला वेठीस धरण्याचे काम केले आहे. या अर्थसंकल्पाला भाजप विरोध करणार असल्याचे भाजप महिला नेत्या सोनाली सरनोबत म्हणाल्या. 

तर माजी आमदार संजय पाटील म्हणाले, राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. कंत्राटदाराचे ३६ हजार कोटींचे थकीत बिल दिले जात नाही. हमीभावाच्या नावाखाली चालणारे सरकार हमीभाव योग्य पद्धतीने देत नाही. सरकारी अधिकारी आत्महत्या करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सिद्धरामय्या सरकारने अर्थसंकल्पात तुष्टीकरण करून इतर समाजावर अन्याय केला आहे. आगामी काळात जनता या सरकारला योग्य धडा शिकवेल असे त्यांनी सांगितले. 

सीएम सिद्धरामय्या यांच्या सरकारने सेबर बजेट सादर करून केवळ एका समुदायाला आकर्षित केले आहे. सेबर बजेटने हिंदू किंवा बेळगावला काहीही दिलेले नाही, अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्षा अनिल बेनके यांनी केली. केवळ अल्पसंख्याकांना अनुकूल आणि इतर समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अर्थसंकल्पाचा प्रदेश भाजप निषेध करत असल्याचे ते म्हणाले. 

तर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी राज्य सरकारने शेतकरी, दलित, मागास, शोषित समाजावर अन्याय केला आहे, अशी टीका केली. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.