- सुदैवाने अनर्थ टळला
बेळगाव / प्रतिनिधी
पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात कंटेनर पलटी होऊन शेजारी सर्व्हिस रोडवर जाऊन पडल्याची घटना आज गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हालगा येथील धाब्यासमोर घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा कंटेनर (क्र. एचआर ५५ एटी २०४०) मुंबईहून बेंगळूरच्या दिशेने पार्सल घेऊन निघाला होता. त्यावेळी हालगा येथील धाब्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला आणि महामार्गावरून थेट शेजारच्या सर्व्हिस रोडवर जाऊन पडला. सदर अपघात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तुरळक वाहतुकीच्या वेळी घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याचप्रमाणे दैव बलवत्तर म्हणून कंटेनरचा चालक आणि क्लिनर दोघेही कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावले.
अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याचप्रमाणे सर्व्हिस रोडवर पडलेला कंटेनर तेथून हटवून रस्ता वाहतुकीस खुला करण्याची कार्यवाही सुरू केली.
0 Comments