• जि. पं. तर्फे जागतिक महिला दिन
  • विविध कार्यक्षेत्रात विशेष कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा केला गौरव

बेळगाव / प्रतिनिधी 

विविध कार्यक्षेत्रात विशेष कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा गौरव करून अधिकाधिक महिलांना कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा अर्थपूर्ण कार्यक्रम आज जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी सर्वप्रथम सर्व महिलांना "जागतिक महिला दिना"च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील तेव्हाच महिला सक्षमीकरण होईल. त्यासाठी महिलांनी मागे न बसता बँका आणि एनआरएलएम योजनेतून कर्ज सुविधा मिळवून स्वयंरोजगार हाती घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच  महिलांनी केवळ मजूर न होता मालक बनले पाहिजे.

सरकारने कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका विभागाच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत आणि महिलांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सांगितले की, महिलांना उद्योजक बनवण्यासाठी सुमारे ५०० अक्का कॅफे उघडण्यात यावेत. पहिला अक्का कॅफे बेंगळुरू येथील पंचायत राज आयुक्तालयात सुरू झाला आणि दुसरा अक्का कॅफे बेळगाव जिल्हा पंचायत हद्दीत सुरू झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सध्या आमच्या जिल्हा पंचायतीमधील अक्का कॅफेच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे जनतेतून कौतुक होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), नरेगा, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि जलजीवन योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुमारे २० महिलांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त बस्तवाड गावातील घनकचरा व्यवस्थापन वाहन चालक कावेरी बसवराज पाटील यांनी सांगितले, या प्रकल्पामुळे आम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाचे आभार मानते.

यावेळी जिल्हा पंचायत मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवतार, सहाय्यक  संचालक जयश्री नंदेण्णा, कार्यालय व्यवस्थापक बसवराज मुराघमठ, अधीक्षक सुशीला वानुर, शिल्पा चौगुला व जिल्हा पंचायत कर्मचारी उपस्थित होते.