खानापूर / प्रतिनिधी 

हलगा (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठरावावर आज शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी, मतदान घेण्यात आले व अविश्वास ठराव संमत झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अविश्वास ठराव पारित होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे.

हलगा ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तसेच विकास कामे करताना पंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. असे कारण देत हलगा पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात हलगा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत महाबळेश्वर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर सदस्यांनी पुन्हा एकदा प्रांताधिकारी कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर महाबळेश्वर पाटील यांनी अविश्वासाविरोधात पुन्हा याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका रद्द करण्यात आली. त्यामुळे आज शनिवार दिनांक १ मार्च रोजी अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच अविश्वास ठराव पारित होणार की नाही, याबाबत पंचायत क्षेत्रातील गावांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक हलगा ग्रामपंचायतीत दाखल झाल्यानंतर अविश्वास ठराव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी रणजीत कल्लाप्पा पाटील,  सुनील मारुती पाटील,  पांडुरंग कृष्णाजी पाटील,  स्वाती सदानंद पाटील,  मंदा महादेव पठाण,  इंदिराताई महादेव मेदार  व नाझिया समीर सनदी या सात  ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यासह इतर दोन सदस्य अनुपस्थितीत राहीले. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रवण कुमार यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी विजयाची निशाणी दाखवून आनंद साजरा केला.

अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे अध्यक्षपद रिकामे झाले आहे. त्यामुळे लवकरच अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे काही महिन्यापासून महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात घातलेल्या अविश्वास ठरावा बाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.